चंदगड : र. भा. माडखोलकर महाविद्यालयात ‘आपत्ती व्यवस्थापन’ कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन, आपत्कालीन परिस्थितीत जीवितहानी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

01 September 2026

चंदगड : र. भा. माडखोलकर महाविद्यालयात ‘आपत्ती व्यवस्थापन’ कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन, आपत्कालीन परिस्थितीत जीवितहानी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

      चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एन. एस. एस.) विभागाच्या वतीने ‘आपत्ती व्यवस्थापन’ या विषयावर विशेष मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या प्रसंगी घाबरून न जाता योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळणे, स्वतःचे तसेच इतरांचे संरक्षण करणे आणि संभाव्य जीवितहानी टाळणे याबाबत विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शकांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती दिली.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एम. माने यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. कोणतीही आपत्ती सांगून येत नसल्याने अशा प्रसंगी आवश्यक ती खबरदारी, प्राथमिक उपचार, बचावकार्य आणि योग्य निर्णयक्षमता यांचे प्रशिक्षण प्रत्येकाने घेतले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

      या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. डी. गावडे यांनी केले होते. कार्यक्रमास संस्थेचे ज्येष्ठ संचालक प्रा. एन. एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांतून आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

    कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मेजर दिलीप थोरात, अल्लाउद्दीन तांडवी, दशरथ पाटील, सुरज चौगुले, श्रीपाद सावंत, संजिव रजाक आणि अमर कुमार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

    यावेळी महापूर, भूकंप, सर्पदंश, हृदयविकाराचा झटका, रस्ते अपघात तसेच इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये कोणती काळजी घ्यावी, मदत येईपर्यंत कोणत्या सुरक्षित उपाययोजना कराव्यात आणि जखमी व्यक्तीला योग्य प्रकारे प्राथमिक मदत कशी द्यावी, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

    विशेषतः आपत्तीच्या वेळी घाबरून न जाता प्रसंगावधान राखणे, स्वतःची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून इतरांना मदत करणे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनातील विविध बाबी समजण्यास मोठी मदत झाली.

    या कार्यक्रमास प्रा. व्ही. के. गावडे, डॉ. बी. एम. पाटील, प्रा. आर. एस. पाटील, डॉ. के. एम. निकम, प्रा. एम. एस. दिवटे, डॉ. आर. के. सूर्यवंशी, डॉ. मोहन घोळसे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले, तर डॉ. एस. एस. सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि तज्ज्ञांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण यामुळे हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त व यशस्वी ठरला.

No comments:

Post a Comment